अरबाज आसिफ शेख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१ डिसेंबर) :- इंदापूर शहरातील अरबाज आसिफ शेख यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली. रविवारी (२६ नोव्हेंबर) मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे संसदरत्न, तथा बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अरबाज शेख यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष पद भूषविले असून, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. कामाची दखल, तथा पक्ष विचारांशी एकनिष्ठ राहिल्याच्या परिणामी त्यांना पक्षाकडून थेट राज्यस्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. या फुटीनंतर राष्ट्रवादीचे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटात सामिल झाले होते. परिणामी तालुक्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याकामी मुळ (original ) राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या गटाकडून तालुक्यात पक्ष बांधणीसाठी हालचाली वेगात सुरू आहेत. खुद्द सुप्रिया सुळे यामध्ये जातीने लक्ष घालत असल्याचेही दिसत आहे. त्यातच अरबाज शेख यांना दिलेली ही जबाबदारी म्हणजे तालुक्यातील युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, तसेच पडत्या काळातही तालुक्यातील युवक शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचा दिलेला हा संदेश आहे अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
दांडगा जनसंपर्क, तसेच तालुका आणि तालुक्याबाहेरदेखील हजारो युवकांशी अरबाज शेख यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करू. तसेच पक्षाचे विचार युवकांपर्यंत पोहोचविणे आणि युवकांच्या माध्यमातून पक्षाला बळकटी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अरबाज शेख यांनी या निवडीनंतर म्हटले आहे. सोबतच त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रांचे आपण ऋणी आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या स्थापनेपासून शेख कुटुंब राष्ट्रवादीसोबत...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शेख कुटुंब पवार कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभे आहे. अरबाज शेख यांचे वडील आसिफ मुबारक शेख हे राष्ट्रवादीचे इंदापूर तालुक्यातील पहिले कार्यकर्ता आहेत. त्यांनी तब्बल १२ वर्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष पद भूषविले आहे. पक्षाशी प्रामाणिकपणाचा हा वारसा अरबाज शेख यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. आसिफ शेख अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जायचे. मात्र अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार गट भाजपसोबत गेले. तदनंतर मात्र शेख कुटुंबीयांनी पक्ष आणि शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे.

योग्य व्यक्तीची निवड. आता काम करायला आवडेल.
उत्तर द्याहटवा