सखोल चौकशी आणि शहानिशा करूनच गुन्हे दाखल करा; इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा इंदापूर पोलिसांना सल्ला
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; अभियंत्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१५ डिसेंबर) :- इंदापूर नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता रविराज राऊत यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सखोल चौकशी करून मगच गुन्हे दाखल करावेत असा सल्ला/समज इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी इंदापूर पोलिसांना दिली आहे. आज (१५ डिसेंबर) या संदर्भात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पोलिसांना लेखी निवेदन दिले असून, कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत घटनेचा निषेध नोंदवला. तसेच संबंधित अभियंत्याला आपला पाठिंबाही दर्शवला आहे. रविराज राऊत यांच्यासह अन्य पाच जणांच्या विरोधात लखन अंकुश काळे (रा. शाहूनगर, इंदापूर) या युवकाच्या फिर्यादीवरून बुधवारी (१३ डिसेंबर) ॲट्रॉसिटीसह शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमकी देण्याशी संबंधित कलमान्वये इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
रविराज राऊत हे चार महिन्यांपूर्वी शाहूनगर भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी करण्याकरिता गेले होते. परंतु तब्बल चार महिन्यांच्या अवधीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही चौकशी, तथा शहानिशा न करता हा गुन्हा दाखल केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून, आज सकाळी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत नगरपरिषद कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडला. सदर प्रकरणात अभियंता रविराज राऊत यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे (रा. सरस्वतीनगर, इंदापूर), सौरभ शिंदे (रा. इंदापूर), अक्षय शिंदे (रा. हिंगणगाव, ता. इंदापूर), नारायण राठोड आणि फलटण येथील इंगल कन्स्ट्रक्शनचे मालक दादासाहेब भोंग (दोघांचाही पत्ता माहीत नाही) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय? गुन्हा दाखल करण्यामागची पार्श्वभूमी कोणती?
शाहूनगर भागात, तथा फिर्यादी काळे यांच्या घरासमोर इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून एप्रिल २०२३ पासून काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे कारण देत लखन काळे यांनी २५ एप्रिल, २६ मे आणि २६ जून असे तीन वेळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यासंदर्भात तक्रार केली होती. परंतु तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. याउलट दाखल गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे कृत्य केले. किमान आत्मदहन केल्यानंतर तरी नगरपरिषद प्रशासन आपल्या तक्रारींची दखल घेईल या हेतूने फिर्यादी यांनी १७ ऑगस्ट रोजी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व बाब फिर्यादीने आपल्या फिर्यादीत नमूद केली आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा