इंदापूर शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूक आणि ऊस वाहतुकीला लगाम घाला - राष्ट्रवादीची मागणी

प्रशासनाने अपघातास कारणीभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी आंदोलन करणार

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१६ डिसेंबर) :- इंदापूर शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांचा आणि धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, गुरुवारी (१४ डिसेंबर) खुळे चौकात एका अवजड वाहनाने दुचाकीवर चाललेल्या दोघा शाळकरी विद्यार्थ्यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभाग आक्रमक झाला असून, इंदापूरचे तहसीलदार, नगरपरिषद आणि पोलिसांना निवेदन देत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यासह, शहरातून जाणाऱ्या बेलगाम उसाच्या ट्रॅक्टर्सना वेगाची मर्यादा घालणे, तसेच बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावर शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, खाजगी व शासकीय दवाखाने, बस स्थानक इ. कारणांमुळे नागरिकांची, विशेषतः विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातून होणारी अवजड वाहतूक, नियमबाह्य व धोकादायक पद्धतीने होणारी ऊस वाहतूक, वाहनांची बेशिस्त पार्किंग आणि फुटपाथवरील अतिक्रमणे अपघातांना कारणीभूत ठरली आहेत. याच कारणामुळे गुरुवारी (१४ डिसेंबर) सकाळी ८-९ वाजण्याच्या दरम्यान खुळे चौकात अवजड वाहनाने धडक दिल्याने दोघे शाळकरी भाऊ बहिण जबर जखमी झाले आहेत. अनेकवेळा मागणी होऊनही नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आर.टी.ओ. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

हे देखील वाचा - नगरपरिषदेच्या अभियंत्यावर खोटा गुन्हा दाखल केला - नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आरोप

नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या प्रशासनाच्या या गलथान कारभारावर मुत्सुद्देगिरीनेही वेळोवेळी आवाज उठवला आहे, आणि भविष्यातही उठवत राहील. दरम्यान वरील मागण्यांसह शहरात कायमस्वरूपी दोघा वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर इंदापूर तालुका सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विकास खिलारे, याच विभागाचे इंदापूर शहराध्यक्ष अनिल ढावरे, तालुकाध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमातीचे आप्पा वाघमोडे, बारामती लोकसभा कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे, महिला शहराध्यक्ष रेश्मा शेख, इंदापूर शहर कार्याध्यक्ष श्रीकांत मखरे, तालुका महिला सरचिटणीस रंजना राऊत, इंदापूर शहर महिला सरचिटणीस तमन्ना शेख, इंदापूर शहर महिला उपाध्यक्ष पूजा कांबळे, इंदापूर शहर उपाध्यक्ष अजय पारसे आदींच्या सह्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट