शेतकऱ्यांची पोरं बंडखोर बनल्यास शासकीय यंत्रणा व राज्यकर्ते जबाबदार - शेतकरी पुत्राची खदखद
प्रतिनिधी : समीर सय्यद
मंगळवार (२३ सप्टेंबर) : केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर अचानक बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील कांदयाचे भाव कमीहोणार हे निश्चित. सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्याने राज्यपाल कोश्यारींना पत्र लिहून भेटण्याची वेळ मागितली असून, शेतकऱ्यांची मुले भविष्यात बंडखोर झाल्यास त्याला शासकीय यंत्रणा व राज्यकर्ते जबाबदार असल्याचे सांगत आपली खदखद व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे यासाठी आता शेतकरी पुत्र पुढे आले आहेत. केंद्र आणि राज्याचा दुवा असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना या संदर्भात सोलापुरातील युवा शेतकरी विरेश आंधळकरने इमेलद्वारे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील नेते, अभिनेत्री कंगना राणावत तसेच इतर बड्या व्यक्तींना भेटीसाठी सहज उपलब्ध होणारे राज्यपाल कष्टकरी शेतकऱ्याच्या पुत्रांना भेटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकरीपुत्र विरेश आंधळकरचे राज्यपालांना पाठवलेले पत्र
मा. श्री भगतसिंह कोश्यारी
महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
विषय - केंद्र सरकारकडून घालण्यात आलेल्या कांदा निर्यात बंदी संदर्भात तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या इतर समस्यांसंदर्भात आपणास भेटणे बाबत.
महोदय
मी विरेश आंधळकर (रा. सौंदरे, ता. बार्शी, जि. सोलापूर) मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये गावी परतावे लागले आहे. ही केवळ माझी एकट्याची परिस्थिती नसून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शहरामध्ये काम करणारी, शिकणारी मुले आता गावाकडे परतलेली आहेत.
हे देखील वाचा - तर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल; इंदापूर शिवसेना शहर प्रमुखांचा बँका, फायनान्स कंपन्यांना सज्जड इशारा
बेभरवशाचं नैसर्गिक हवामान आणि यामध्ये शेतात काही पिकलं तरी बाजारामध्ये होणारी आमच्या शेतमालाची साठमारी पाहता आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले शिकवून शहरामध्ये नौकरीसाठी पाठवले, शेती करण्याची इच्छा असतानाही आम्हाला शहरात काम करावं लागतं. परंतु वैश्विक महामारीमुळे आता गावी परतावे लागले. त्यामुळे वडिलोपार्जित शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी काम करून उत्पन्न काढण्यासाठी जीवाचे रान केले आहे. यंदा निसर्गाने देखील साथ दिली आहे, मात्र त्यातही अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी यंदा मेटाकुटीला आलेला आहे. जास्त पावसामुळे रोपांवर रोग पडले ३ ते ४ हजार रुपये किलोने घेतलेले कांदा बियाणे यामुळे खराब झाले. त्यातून काही वाचलेल्या रोपांची लागण केली तर आता केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी लादली त्यामुळे कांदा भाव गडगडणार यात शंका नाही.
उत्पादन खर्च एकरी ३५-४० हजारांच्यावर जात असताना भाव मात्र किरकोळ मिळणार असल्याने खर्चही निघणार नाही. शेतीमध्ये विजेच्या वेळा रात्री अपरात्री असतात त्यामुळे जीवावर उदार होऊन अंधारामध्ये पिकांना पाणी द्यावे लागते, रोगांमुळे हजारोंची औषधे फवारणी व खत टाकावी लागतात, अशामध्ये शेतकरी आणि शेतीबद्दलचे निर्णय घेताना सरकार दरबारी आमची दखल घेतलीच जात नाही. हीच परिस्थिती राहणार असेल तर कष्टकरी शेतकऱ्यांची पोर बंडखोर बनल्यास त्याला जबाबदार शासकीय यंत्रणा आणि राजकर्ते असणार आहेत.
हे देखील वाचा - इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; भाजपा आणि महायुतीच्या घटक पक्षांनी मागणी
आपण संपूर्ण राज्याचा आधार आहात. आजवर अनेक राजकारणी, सिनेकलाकारांनी आपली भेट घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. नैसर्गिक आणि सरकारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपणच आता आधार होऊ शकता. तरी वरील सर्व परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपली भेट मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तरी कृपया इतरांप्रमाणे आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना देखील भेटण्यास वेळ द्यावा ही हात जोडून विनंती
कळावे,
विरेश आंधळकर (आपल्या राज्यातील एक शेतकरी पुत्र)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा