तर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल; इंदापूर शिवसेना शहर प्रमुखांचा बँका, फायनान्स कंपन्यांना सज्जड इशारा

प्रतिनिधी : समीर सय्यद 

इंदापूर (२१ सप्टेंबर) : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असताना इंदापूर तालुक्यातील बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या, बचतगट नागरिकांना कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावत आहेत. कोरोनाचे संकट निवळेपर्यंत कर्जवसुलीसाठी तगादा लाऊ नये, अन्यथा याद राखा इंदापूर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा इंदापूर शिवसेना प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांनी दिला आहे. बँका अथवा फायनान्स कंपन्यां कर्जाच्या वसुलीसाठी त्रास देत असतील तर नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन मेजर सोमवंशी यांनी केले आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे इंदापूर तालुक्यातील नागरिक भलतेच त्रस्त आहेत. गेले सहा महिने लॉकडाऊनच्या लपंडावामुळे तालुक्यातील आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने व्यवसाय, शेती, शिक्षण, आणि लघुउद्योगांसाठी कर्ज घेणारे व्यापारी, मजूर, मध्यमवर्गीय नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. आरबीआयने नागरिकांना मोरोटॉरियमच्या माध्यमातून ३१ ऑगस्ट पर्यंत कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सूट दिली असली तरी या काळातील हप्त्यांवरील व्याज भरण्याची टांगती तलवार कर्जदारांवर आहेच. या काळातील स्थगित हप्त्यांवरील व्याज माफ करण्यासाठी विविध संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र अद्याप यावर निर्णय गुलदस्त्यात आहे.


आरबीआयने दिलेली मुदत संपली असली तरी नागरिकांच्या समस्या मात्र जागीच आहेत. बँका व फायनान्स कंपन्या कर्जदारांकडून सक्तीने कर्जाचे हप्ते वसूल करीत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाबकाने फोडून काढू असा दम दिला होता. आता शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांनी बँका आणि फायनान्स कंपन्यांना कर्ज वसुली न थांबवल्यास अथवा यातून आत्महत्तेसारखे प्रकार घडल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने धडा शिकवेल असा सज्जड इशारा दिला आहे. इंदापूर तालुक्यात बँका, पतसंस्था, बचतगट आणि छोट्या मोठ्या फायनान्स कंपन्यांची एकूण संख्या १०० च्या आसपास असून यामध्ये काम करणारे ९०% कर्मचारी हे स्थानिक रहिवाशी आहेत. तर आम्हाला वरूनच दबाव असल्याने कर्ज वसूलीसाठी तगादा लावला लागत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या संकट काळात शिवसेना नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, नागरिकांना बँका अथवा फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी त्रास दिल्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांशी करा अथवा 9422492455 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मेजर सोमवंशी यांनी केले आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट