कोरोना रुग्णांच्या सेवेतून पळ काढणार नाही - डॉ. अविनाश पाणबुडे

समीर सय्यद (उपसंपादक)

इंदापूर (२३ सप्टेंबर) : इंदापूर तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध असलेले हृदयरोग तज्ञ डॉ. अविनाश पाणबुडे नुकतेच कोरोनामुक्त होऊन स्वगृही परतले. राधिका गणेश मंदिरासमोर राधिका सेवा संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाघ आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. पाणबुडे यांनी कोरोनाग्रस्त ते कोरोनामुक्त या प्रवासाबद्दल आपले अनुभव सांगितले. आपण लवकरच पुन्हा इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी हजर राहणार असल्याचे आश्वासन देखील दिले.

इंदापूर तालुक्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत आहे. कोरोना रुग्णांची सेवा करीत असताना डॉ. अविनाश पाणबुडे देखील कोरोना बाधित झाले होते. सोमवारी (२१ सप्टेंबर) रात्री ९.३० वा. च्या सुमारास ते मुंबईहून कोरोनावर यशस्वी मात करून आपल्या स्वगृही परतले. याप्रसंगी मुंबईहून आणण्यासाठी आपली रुग्णवाहिका उपलब्ध करून देणारे राधिका सेवा संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाघ आणि मित्र परिवाराच्या वतीने राधिका गणेश मंदिरासमोर फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत डॉ. पाणबुडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

कोरोनामुक्त झाल्यानंतर पळ न काढता आता आपण लवकरच इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे डॉ. पाणबुडे यांनी स्पष्ट केले. कोरोनाग्रस्त ते कोरोनामुक्त होण्याच्या दरम्यानच्या काळात आलेले अनुभव सांगताना डॉ. पाणबुडे म्हणाले, इंदापूरकरांच्या शुभेच्छा, सहकार्य आणि आशीर्वादाच्या जोरावरच आपण कोरोनामुक्त झालो.

हे देखील वाचा - कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या १२ कोविड योद्धांना इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने प्रोत्साहन भत्ता

सध्यातरी कोरोनावर कोणतेच औषध नसून, आयुष्यात मित्र कमवा कारण त्यांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादच कोरोनामुक्तीसाठी उत्तम मेडिसिन आहे. मुंबईमध्ये चांगल्या वैद्यकीय सुविधा असणाऱ्या रुग्णालयात उपचार घेत असताना आपण तेथील उपचार पद्धतीचे निरीक्षण केल्यानंतर जाणवले की, मुंबईमधील उपचार पद्धती इंदापूरपेक्षा फार वेगळी आहे. भविष्यात आपण उपलब्ध वैद्यकीय सुविधा व साधनांचा उपयोग करून इंदापूर तालुक्यातील रुग्णांना मुंबईसारखे उपचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून रुग्णांना पुण्यामध्ये उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही.

हे देखील वाचा - तर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल; शिवसेना शहर प्रमुखांचा बँका, फायनान्स कंपन्यांना सज्जड इशारा

आपण लवकर आपल्या खाजगी रुग्णालयाबरोबरच इंदापूर तालुक्यातील शासकीय रुग्णालयात देखील सामान्य आणि गरीब रुग्णांच्या सेवेत पूर्ण क्षमतेने रुजू होणार असल्याची ग्वाही दिली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सला पर्याय नसून, मास्क, सॅनिटायझर वापरणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात जिथे जवळची नाती संपुष्टात आली तिथे सहकार्याच्या जोरावर अनेक अनोळखी नाती निर्माण देखील झाली. डॉ. पाणबुडे कोरोनामुक्त झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघाली असून, इंदापूरकरांच्या सेवेसाठी ईश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना - अरविंद वाघ (अध्यक्ष, राधिका सेवा संस्था)

आपल्या खाजगी रुग्णालयाबरोबरच इंदापूर तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सेवा देत असताना डॉ. पाणबुडे कोरोना बाधित झाले. आता ते बरे होऊन परतल्याने सर्वांना अतिशय आनंद झाला आहे. यापुढे कोरोनाविरुद्धची लढाई आपण सर्वांनी मिळून लढायची आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागून डॉक्टरांना व सर्व यंत्रणेला सहकार्य करावे - डॉ. मिलिंद खाडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट