इंदापूर पोलिसांना अपघाताने सापडला ५ लाख ६० हजारांचा गांजा

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (६ जुलै) :- इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे सोलापूर हायवेवर अपघातग्रस्त झालेल्या एका परप्रांतीय चारचाकी वाहनात तपासणी दरम्यान पोलिसांना तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांचा गांजा आढळून आला. सोमवारी (४ जुलै) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अपघाताने उघडकीस आलेल्या या घटनेनंतर राजस्थान पासिंग असलेल्या टोयोटा कंपनीच्या ग्लेंजा या चारचाकी वाहनाच्या अज्ञात मालक आणि चालका विरोधात सहाय्यक फौजदार नितीन तांबे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे द्रव्य अधिनियम १९८५, कलम २० ब आणि ८ क, तसेच भा. द. वि. कलम २७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री पालखी तळावर पेट्रोलिंग दरम्यान इंदापूर पोलिसांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अमोल विष्णू मसगडे या जवानाकडून पुणे सोलापूर हायवेवरील पायल सर्कल नजिक देशपांडे व्हेज समोर पुणे सोलापूर हायवेवर चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने इंदापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने अपघातग्रस्त झालेल्या टोयोटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या ग्लेंजा (आरजे ०६ सीई ९२२८) या चारचाकी वाहनाची पाहणी केली. या वाहनाच्या डिकीमधून उग्र वास आल्याने पोलिसांनी डिकीची तपासणी केली असता पिवळ्या व पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये ५ लाख ६० हजार रु. किंमतीचा २८ किलो गांजा आढळून आला. या कारवाईमध्ये इंदापूर पोलिसांनी वाहन आणि गांजा असा एकूण १५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेत अपघातग्रस्त वाहनाचा चालक मात्र पोलिसांचे पथक घटनास्थळी येण्याआधीच फरार झाला होता.

सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, सपोनि नागनाथ पाटील, सपोनि ज्ञानेश्वर धनवे, सपोनि महेश माने, पोसई दाजी देठे, सहा फौ. नितीन तांबे, सहा फौ. चालक कदम, पो. ना. चौधर, पो. ना मोहिते पो.ना. सलमान खान, पो.ना. मोहम्मद अली मडडी, पो. कॉ. शिंगाडे, पो. कॉ विशाल चौधर, पो. कॉ. राखुंडे यांच्या पथकाने केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट