नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगण, नाचे विठू काळजात !!! - वाचा भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या रिंगण सोहळ्यातील काही निवडक वैशिष्टे

इंदापूर येथे भक्तिमय वातावरणात पार पडले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे दुसरे रिंगण

समीर सय्यद (उप संपादक)

कोरोना संकटामुळे सलग दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रथमच जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे अश्वरिंगण (गोल) हजारो वैष्णवांच्या आणि लाख मोलाची ही आठवण डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी जमलेल्या इंदापूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत शनिवारी (२ जुलै) इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर पार पडले. यावेळी नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगण, नाचे विठू काळजात!! अशा भावना अश्व रिंगणाचा सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि इंदापूर ग्रामस्थांच्या मनात होत्या.

शुक्रवारी (१ जुलै) निमगाव (ता. इंदापूर) येथील मुक्कामानंतर शनिवारी (२ जुलै) सकाळी ११ वा. ५२ मिनिटांच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तुकारामांच्या जयघोषात रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आगमन झाले. विशेष म्हणजे सकाळी सात आठ वाजल्यापासूनच रिंगण सोहळा पाहण्यासाठी रिंगण स्थळावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हजारो नागरिक रयत शाळेच्या इमारतीवर, शेजारी वेगवेगळ्या रहिवाशी संकुलांवर देखील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी कोणतीही गडबड होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, कर्मचारी, तसेच इंदापूर शहरातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी या रिंगण सोहळ्याला हजेरी लावली होती. सलग दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळा खंडित झाल्याने यावर्षी रिंगण सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत होता. मानाच्या अश्वाच्या रिंगणाआधी अवघे काही सेकंद बरसलेल्या पावसाच्या रिमझिम सरींनी भक्तिमय वातावरणात आणखीनच आनंद भरला होता. असे वाटत होते जणू या पावसाच्या सरी अस्मानातून तुकोबांचे मालोजी राजेंच्या या इंदापूर नगरीत स्वागत करीत आहेत.


टाळ मृदूंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या जयघोषात लहान थोरांनी मोठ्या उत्साहाने डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. प्रथम झेंडेकरी वारकऱ्यांनी, तदनंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकऱ्यांनी, मग विणेकरी आणि शेवटी पखवाज वादक वारकऱ्यांनी मानाच्या पालखीबरोबर मोठ्या उत्साहात धावत रिंगणाच्या मधोमध फुलांनी सजवून चौथऱ्यावर ठेवण्यात आलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीला प्रदक्षिणा घातल्या. यावेळी विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल वृद्धांचे भान अक्षरशः हरपले होते. देहभान हरपून विठुनामाचा जप आणि तुकाराम महाराजांचा जयघोष करीत महिला व पुरुष वारकऱ्यांनी रिंगण पूर्ण केले. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले होते. तदनंतर बाभळगावकर यांच्या मानाच्या अश्वासह मोहिते पाटील यांच्या अश्वाने हजारो वारकरी आणि इंदापूर ग्रामस्थांच्या साक्षीने पालखीला प्रदक्षिणा घातल्या. या प्रदक्षिणेनंतर अश्वांच्या चरणाखालील रज भाळी लावण्यासाठी नगरिकांची एकच झुंबड उडाली होती. या रिंगण सोहळ्यादरम्यान महिला, पुरुष, युवक, युवती यांच्यासह महिला होमगार्ड आणि एनसीसीच्या विद्यार्थिनींनी देखील फुगड्यांचा फेर धरला होता. यावेळी कोणी टाळ, कोणी मृदुंग, पखवाज, तर कोणी विणेच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला होता.

अश्व रिंगणानंतरही, 'सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ, मोहपाश || या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे संपूर्ण रिंगण मैदानावरील वारकरी, नागरिक, महिला पुरुष, भजन-कीर्तन, झिम्मा-फुगड्यांच्या माध्यमातून भक्तिरसाच्या रंगामध्ये रंगून गेले होते. तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी रिंगण मैदानावर गर्दी केली होती. पालखीच्या पुढे २७, तर पालखीच्या पुढे ३२७ दिंड्या होत्या. नेहमीपेक्षा दिंड्या कमी वाटत होत्या. उत्साह मात्र जोमात होता. आता दोन दिवसांच्या (२ व ३ जुलै) इंदापूर मुक्कामानंतर पालखी सोमवारी (४ जुलै) पहाटे सराटीमार्गे पंढरपूरकडे पस्थान करणार आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बनले होते माऊलींच्या रथाचे सारथी


टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी ११ वा. ५२ मिनिटांच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची पालखी ठेवण्यात आलेल्या रथाचे आगमन रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी झाले. यावेळी उपस्थित वारकरी आणि नागरिकांनी ज्ञानबा तुकाराम नावाचा जयघोष करत पालखीचे उस्फुर्त स्वागत केले. यावेळी फुलांनी सजविण्यात आलेल्या या पालखी रथाचे सारथ्य माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे करीत होते. यावेळी एका प्रदक्षिणेनंतर माऊलींची पालखी रिंगण सोहळ्याच्या मधोमध फुलांनी सजविण्यात आलेल्या आकर्षक छत्राखाली ठेवण्यात आली.

प्रदीप गारटकर आणि नितीन महाराज मोरे यांची फुगडी


रिंगण सोहळा आटोपल्यानंतर मैदानावरील वारकरी, नागरिक, महिला पुरुष, भजन-कीर्तन, झिम्मा-फुगड्यांच्या माध्यमातून भक्तिरसाच्या रंगामध्ये रंगून गेले होते. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी देखील एकमेकांबरोबर फुगडीवर ठेका धरत विठ्ठलाच्या भक्तिमय रसात डुंबण्याचा आनंद घेतला.

मूकबधिर मुलांची विठ्ठल, रखुमाई आणि तुकाराम महाराजांची वेशभूषा लक्ष वेधणारी


या रिंगण सोहळ्यासाठी इंदापूर शहरातील विविध शाळांनीही बाल चिमुकल्यांसह आपली उपस्थिती लावली होती. यावेळी इंदापूर शाळेतील श्री. स्वामी समर्थ व्यायामशाळा संचलित मूकबधिर, मतिमंद निवासी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगावर ठेका धरला होता. विशेष करून या चिमुकल्यांमध्ये विठ्ठल रखुमाई आणि पाठोपाठ तुकाराम महाराजांची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

मानवी मनाची सफाई करणारे आधुनिक गाडगे बाबाही वारीत


गाडगे महाराजांप्रमाणे वेशभूषा करून कचऱ्या बरोबर मानवी मनाची सफाई करणारे निर्मल बाबांनी (फुलचंद नागटिळक, रा. गणेशवाडी, ता. कर्जत) लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते मागील २२ वर्ष समाज गाडगे महाराजांप्रमाणे प्रबोधनाचे कार्य करीत असून, ही त्यांची ७ वी पंढरपूर वारी होती. त्यांनी आतापर्यंत ३९ अभंग देखील लिहिले आहेत. आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी, विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, गुणंरिचा भक्तिभाव, जनमाणसात पाहतो देवं, सत्यकर्म माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्तीत रमते नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोजन्मी सेवा घडावी, हेच मागतो फुलचंद.

मेंढराची ही सातवी वारी; रिंगण ही मारतो हा मेंढरू


या रिंगणाचे अजून एक वैशिष्ठ्य की या रिंगणासाठी माढा तालुक्यातील एक धनगर बांधव आपल्या एका मेंढरासह उपस्थित होते. मेंढरु आमची लक्ष्मी असून, ही तुकाराम माऊली आणि विठ्ठलाची आमच्यावर असलेली सर्वात मोठी कृपा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या मेंढरासह ही त्यांची आठवी वारी असून, हे मेंढरु रिंगणावेळी तुकाराम महाराजांच्या पालखीला प्रदक्षिणाही मारत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टीप :- RNI नोंदणीकृत असलेल्या व आधुनिक वैशिष्ट्यांसह लवकरच सुरू होत असलेल्या निर्भिड, निष्पक्ष मुत्सुद्देगिरीच्या ऑनलाईन पोर्टलसाठी इंदापूर तालुका आणि तालुक्याबाहेर प्रतिनीधी नेमणे आहेत. इच्छुक उमेदवारांनी कृपया ८०५५५३७००१ या नंबरवर संपर्क करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट