जीवनात यशस्वी होण्यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे - शंकरराव करपे
![]() |
| शंकरराव करपे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना |
काल (३ नोव्हेंबर) इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांना, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, कमावलेल्या पैशांची गुंतवणूक कोठे, कशी आणि किती करावी, खर्चाचे मापदंड काय असावेत? याविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी साताऱ्याच्या 'गिरिषा वेल्थ मेकर प्रायव्हेट लिमिटेड, या संस्थेचे शंकरराव करपे यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचे सचिव मुकुंद शहा, आरोग्य निरीक्षक मनोज बारटक्के, सहाय्यक आरोग्य निरीक्षक अशोक चिंचकर, लीलाचंद पोळ, सुनील लोहिरे व नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ पठाण यांनी केले.
![]() |
| नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना |
हे देखील पहा - इंदापूरमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर; जयंती विधायक पध्दतीने साजरी
शंकरराव करपे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ मुबलक पैसा कमावणे महत्त्वाचे नसून, कमावलेल्या पैशांच्या खर्चाचे नियोजनही तितकेच महत्वाचे आहे. कमावलेला पैसा कधी, कुठे आणि कसा गुंतवावा, खर्चाचे मापदंड काय असावेत? ज्याला याचा योग्य ताळेबंद करता आला तोच व्यक्ती जीवनात यशस्वी होतो. आपली मिळकत किती आणि खर्च किती कळण्यासाठी प्रत्येकाने रोजच्या जमा-खर्चाचे लिखाण करणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळणे, मासिक उत्पन्नातून भविष्यामध्ये होणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, आरोग्य आणि वृद्धापकाळातील गरजांसाठी बचत आणि पैशांची योग्य गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे आहे. खर्चांसाठी बचत करणे व गुंतवणूक करताना योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन घेणे फार महत्त्वाचे आहे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.
शंकरराव करपे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभल्याने, आता भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी मिळणाऱ्या उत्पन्नाचे योग्य आर्थिक नियोजन नक्की करतील - सौ. अंकिता शहा (नगराध्यक्षा, इंदापूर नगरपरिषद)
कर्मचाऱ्यांनी अनावश्यक खर्चासाठी गरज नसताना बँकांचे कर्ज काढू नये. मिळणाऱ्या उत्पन्नातून बचत करून खर्चाचे नियोजन करावे - डॉ. प्रदीप ठेंगल (मुख्याधिकारी, इंदापूर नगरपरिषद)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा