इंदापूर शासकीय कार्यालये सामान्यांच्या लुटीचे केंद्र? महसूल विभागातील महिला कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
२५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; स्वतः आणि साहेबांसाठी मागितली होती लाच
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
शासनाचा भरमसाठ पगार असूनही हरामच्या कमाईसाठी शेतकऱ्याला लाच मागणारी इंदापूर महसूल विभागातील लाचखोर महिला कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी झालेल्या या कारवाईमध्ये शेतातील रस्त्याच्या प्रलंबित प्रकरणातील कागदपत्रे फिर्यादीला देण्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या महसूल विभागात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत कावेरी विजय खाडे (रा. संघवी नगर, बारामती, जि. पुणे) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या संदर्भात भांडगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शेतकरी हनुमंत अनिल मदने यांनी २७ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा याकामी फिर्यादीच्या वडिलांनी इंदापूर तहसीलमध्ये २७ जानेवारी २०२० रोजी अर्ज केला होता. या प्रलंबित प्रकरणाच्या निकालाशी निगडित कागदपत्रे बनवून देण्यासाठी खाडे बाईंनी मदने यांच्याकडे ३० हजारांची लाच मगितली होती, जी नंतर २५ हजारांवर डन झाली. मदने यांनी तक्रार दाखल केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी सापळा रचून या लाचखोर बाईंना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. तदनंतर शनिवारी (१ मार्च) इंदापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, कलम ७ व ७ (अ) अंतर्गत खाडे बाईंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचेच्या रकमेसंदर्भात तोडपाणी करताना "साहेबांना काय सांगू?" अशा त्या मॅडम फिर्यादीला म्हटल्याचे, तथा बाईंनी स्वतः आणि साहेबांसाठी लाच मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे तो छुपा रुस्तम साहेब, ती महान विभूती शोधणं, त्यालाही चौकशीच्या घेऱ्यात घेणं, अथवा फिर्यादीच्या आरोपातील तथ्य तपासणं गरजेचं आहे.
सबळ पुरावे असतानाही आरोपी सुटतातच कसे?
आश्चर्य म्हणजे बोटांचे ठसे, पंच, ऑडियो रेकॉर्डिंग एवढे सबळ पुरावे असतानाही अपवाद वगळता बहुतेक लाचखोर प्रकरणातून शाबूत बाहेर कसे निघतात हा संशोधनाचा विषय आहे. शासकीय कार्यालये म्हणजे सामान्यांसाठी अवघड जागेचं दुखणं झालं आहे. "काम न करता शासनाचा पगार आणि काम करण्यासाठी लाचेचं घबाड" ही बहुतेक शासकीय कर्मचाऱ्यांची (अपवाद वगळता) ओळख झाली आहे. खरं तर आजघडीला लाच आणि भ्रष्टाचाराच्या शेणात एखादा शासकीय कर्मचारी लोळला नसेल तर त्याला देव माणूस म्हणावं लागेल. परंतु, सापडला तो चोर, नाही तर बादशाहपेक्षा थोर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चोर ठरण्याआधीच अशा थोर माणसांवर कायद्याचा वचक बसवणारी यंत्रणा कधी निर्माण होणार? हा प्रश्न सामान्यांना पडणे साहजिक आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना हराम पैशांचा मोह?
शासकीय कर्मचाऱ्यांना लागलेल्या हराम पैशांच्या मोहामुळे इंदापूर तालुक्यातील शासकीय कार्यालये ही सामान्य नागरिकांच्या लुटीचे केंद्र बनली आहेत. विशेषतः याच्यामध्ये सामान्य गोर गरीब जनता, शेतकरी भरडले जात आहेत. याआधीही याच प्रशासकीय भवनामधील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असणारा लिपिक राजाराम दत्तात्रय शिंदे (रा. ढोक बाभूळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) १४ जून २०२२ रोजी शेतकऱ्याकडून २० हजारांची लाच घेताना, तर १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अश्विनी गणेश भोंग (वय ३६ वर्ष, रा. सरस्वतीनगर, क्रिडा संकुल रोड, इंदापूर) ही पंचायत समितीतील समाज कल्याण विभागात कार्यरत महिला कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली होती.
.jpg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा