दिव्य कुरआनातील आदेशाला मूर्त स्वरूप - इंदापूर शहरात मस्जिदमध्ये सुरू झाली अभ्यासिका
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क (समीर सय्यद)
इंदापूर (२६ फेब्रुवारी) - दिव्य कुरआनातील इकरअ अर्थात "वाच आपल्या पालनकर्त्याच्या नावाने ज्याने तुला निर्माण केले" या आयतीपासून प्रेरित होऊन इंदापूरमधील मुस्लिमांनी एका अनोख्या, परंतु इस्लाम इतक्याच पुरातन, तथा मुहम्मद पैगंबरांनी मस्जिदे नबवीमध्ये राबविलेल्या आदर्श उपक्रमाला नव्याने सुरुवात केली आहे. इंदापूर शहरातील शेख मोहल्ला स्थित मक्का मस्जिदमध्ये मुस्लिम युवकांसाठी 'इकरअ' या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. त्यामुळे इंदापूर शहरातील मुस्लिम युवकांना आता मक्का मस्जिदमध्ये आध्यात्मिक आणि आदर्श इस्लामी संस्कारांबरोबरच आधुनिक शिक्षणही घेता येणार आहे. मस्जिदशी संलग्न जवळपास ७५० स्के.फू. जागेतील या अभ्यासिकेत एकाच वेळी २० पेक्षा जास्त मुस्लिम युवक भविष्य घडविण्यासाठी ज्ञानार्जन करू शकणार आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी या स्टडी सेंटरचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन, पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी व राष्ट्रपती पदक प्राप्त निवृत्त एसीपी जानमोहम्मद पठाण, निवृत्त सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शमीम शेख, पुणे जिल्ह्याचे मराक्का सचिव अब्दुलरज्जाक मुल्ला हे विशेष उपस्थित होते. तसेच ॲड. इनायतअली काझी, मक्का मस्जिदचे इमाम इरफान कुरेशी, हाजी युसुफ शेख, हाजी शरफुद्दिन मोमिन, इरफान शेख, मेहबूब शेख, अकील मोमिन, निहाल काझी, अल्ताफ पठाण यांच्यासह विविध क्षेत्रातील विद्वान, विविध शाखेतील विद्यार्थी, युवक, आध्यात्मिक गुरू, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जानमोहम्मद पठाण यांनी म्हटले की, दिव्य कुरआनमध्ये पहिली आयतच शिक्षण घेण्यासंदर्भात अवतरीत झाली आहे. तर पैगंबर साहेबांनीही शिक्षण घेणे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीवर अनिवार्य ठरविले आहे. त्यामुळे मुस्लिमांनी शिक्षणामध्ये अग्रगण्य असणे अपेक्षित असतानाही दुर्दैवाने शिक्षणामध्ये, परिणामी प्रशासन आणि एकूणच सर्व क्षेत्रात मुस्लिमांची संख्या नगण्य आहे. परंतु मक्का मस्जिदमध्ये सुरू झालेल्या इकरअ स्टडी सेंटरसारख्या उपक्रमामुळे ही परिस्थिती लवकरच बदलेल. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे असून, "जिथे मस्जिद तिथे अभ्यासिका" हे धोरण राबविणे काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तर डॉ. शमीम शेख यांनी इस्लामची शिकवण आणि आधुनिक शिक्षण एकमेकांना पूरक असल्याचे सांगताना भविष्यात जो शिकेल तोच टिकेल असे म्हटले. सोबतच त्यांनी, इकरअ स्टडी सेंटरसाठी उभारण्यात महत्वाचा वाटा असलेले मक्का मस्जिदचे विश्वस्त आणि मेहनत घेणाऱ्या इतरांचेही कौतुक करताना, शिक्षण, ज्ञानार्जन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इंदापूरमधील मुस्लिम युवकांना या स्टडी सेंटरच्या संधीचा फायदा उचलण्याचे आवाहन केले.
स्पर्धा परीक्षेच्या तयारी सह विविध विभागात शिक्षण घेणाऱ्या युवकांना पुस्तके आणि आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्याचा मक्का मस्जिद ट्रस्टींचा मानस आहे. इंदापूर तालुक्यात या पद्धतीचा हा पहिलाच उपक्रम असून, भविष्यात हा उपक्रम मुस्लिम समाजासाठी प्रेरणादायी आणि शैक्षणिक प्रगतीला पूरक ठरणार आहे. युवकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे वेळोवेळी आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न असेल - मुजीब शेख (मक्का मस्जिद विश्वस्त, इंदापूर)


very good 👍 hum ko bhi kuch idea Diya kro Bhai
उत्तर द्याहटवा