इंदापूर शहरात वीजेचा लपंडाव; व्यापारी, नागरिक, विद्यार्थी त्रस्त

ऑक्टोबर हीट, त्यात इंदापूर महावितरणचा नियोजनशून्य कारभारामुळे लाईटचा खोळंबा होत असल्याने इंदापूर शहरातील नागरिकांच्या रागाचा पारा चांगलाच चढू लागला आहे. न चुकता वीज बिलासाठी नागरिकांच्या मागे त्राधा लावणाऱ्या, वीजबिल थकल्यास कनेक्शन कट करण्यासाठी लगबग करणाऱ्या वीज महावितरणच्या कारभाराविरोधात इंदापूर शहरातून विशेषतः व्यापारी वर्गातून नाराजीचा सुर वाढू लागला आहे. ऑनलाईन सेवा, झेरॉक्स सेंटरसह शहरातील अनेक लहान मोठे व्यवसाय विजेवर अवलंबून आहेत. मात्र लाईटच्या अनियमित पुरवठ्यामुळे संबंधित व्यवसायांशी निगडित व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी व्यापारी हवालदिल झाले आहेत. किमान व्यापारी संघटनेने यावर लाईट बोर्डाला जाब विचारणे गरजेचे आहे. अन्यथा महावितरणची मस्ती कमी होणार नाही.

इंदापूर शहरातील अनेक शासकीय कार्यालये, तसेच खाजगी व शासकीय रुग्णालय, नागरिक, विद्यार्थी असे अनेकजण विजेच्या लपंडावाने प्रभावित झाले आहेत. विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती, शस्त्रक्रियेसारख्या आपात्कालीन परिस्थितीतही लाईटच्या समस्येमुळे जनरेटर चालू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. अशा आपात्कालीन परिस्थितीत केवळ वीज महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एखादी जीवितहानी झाल्यास महावितरणचे अधिकारी, कर्मचारी जबाबदारी घेतील का? विविध विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिवाळी पूर्व होणाऱ्या सत्र परीक्षाही सध्या सुरू आहेत. परंतु ऑक्टोबरची हीट, त्यामुळे होणारा उकाडा आणि विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होत आहे. वीज खंडित केली जाणार असेल तर त्याची पूर्वसूचना ग्राहकांना देणे गरजेचे आहे. मात्र ती दिली जात नाही. पुरवठ्यात तांत्रिक बिघाड 

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा सर्वात जास्त फटका कसबा परिसराला

वीजेचा लपंडाव आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा सर्वात जास्त फटका कसबा परिसरातील तारेच्या शाळेपासून पूर्वेकडे संभाजी महाराज चौक, जुमा मस्जिद परिसर, रोहिदास गल्ली आणि आसपासच्या भागाला बसत आहे. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे निकामी ठरत असून, या उपकरणांमध्ये बिघाड निर्माण होत आहेत. पहाटेपासून सकाळी १०-११ वाजेपर्यंत पंखेही धीम्या गतीने चालत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. भरमसाठ वीजबिल, मात्र अनुपयोगी वीज या कात्रीत सापडल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. गुरुवारी शहरातील बहुतेक भागात लाईट असते. मात्र कसबा परिसरातील काही भागात नित्यनियमाने लाईट गुल नसते. याची कारणेही महावितरणने स्पष्ट करणे गरजेचे आहे.

महावितरणचे कर्मचारीही वीज चोरी करतात?

शहरातील अनेकजण आकड्यावर, मीटरला रीमोटच्या साहाय्याने ऑपरेट करून, अथवा बायपास करून सर्रास लाईट वापरतात. या वीज चोरीचा फटका प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या सामान्य इंदापूरकरांना बसत आहे. विशेष म्हणजे अशा विविध मार्गाने वीज चोरणाऱ्या चोरांमध्ये महावितरणचे कर्मचारीही सामिल असल्याची, तसेच सरळ अथवा छुप्या मार्गाने हे कर्मचारी अशा वीजचोर नागरिकांना मदत करत असल्याची सामान्यांमधील चर्चा कदाचित महावितरणच्या व्यवस्थेपासूनही लपलेली नाही. यातील सत्यता तपासणे गरजेचे आहे. मात्र ज्या गावचा बार त्याच गावचा हवालदार असल्याने बार मालकाला अर्थात वीज चोरांना पकडणार कोण?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट