तोतया डॉक्टरच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू? तोतया डॉक्टर आणि महाराजावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२९ ऑगस्ट) :- उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील विविध धार्मिक स्थळांच्या सहलीसाठी गेलेली कांदलगाव येथील एक महिला आयोजकांचा हलगर्जीपणा आणि तोतया डॉक्टरच्या वैद्यकीय उपचाराची बळी ठरली. शोभा देविदास सरडे (रा. कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, देविदास दगडू सरडे (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून विजय राजेंद्र वलगे (रा. मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अनिरुद्ध उर्फ निखिल रामभाऊ निंबाळकर (रा. बिटरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दोघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात १७ ऑगस्ट २०२४ रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी या घटनेतील आरोपी व तोतया डॉक्टर असल्याचा आरोप असलेल्या विजय राजेंद्र वलगे या आरोपीला काल (२८ ऑगस्ट) अटक करण्यात आली आहे. इंदापूर न्यायालयाने आज त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची घटना १७ जुलै २०२३-२६ जुलै २०२३ दरम्यान घडली असून, कांदलगाव येथील ७, तर इतर ठिकाणच्या एकूण २० महिला व पुरुष वर नमूद राज्यातील विविध धार्मिक स्थळांच्या सहलीसाठी गेल्या होत्या. सहलीदरम्यान ८ जणांना वैद्यकीय उपचारांची गरज असतानाही आयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले. घटनेत मृत्यू झालेल्या शोभा सरडे यांना उपचारांची नितांत आवश्यकता असतानाही त्यांना रुग्णालयात दाखल न करता आरोपी विजय राजेंद्र वलगे या तोतया डॉक्टरकरवी खाजगी औषधालयातील औषधांआधारे मथुरा (उत्तरप्रदेश) येथील विश्वसेवा वृंदावन आश्रमातच वैद्यकीय उपचार करण्यात आले. परिणामी आरोग्य खालावल्याने, तथा आरोपींकडून अयोग्य उपचार, तसेच योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने २६ जुलै २०२३ रोजी ग्वालियर (मध्यप्रदेश) येथील जे.ए.एच. या शासकीय रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वरील सर्व हकीकत फिर्यादीत नमूद असून, या सहलीचा आयोजक, तथा महिलेच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप असलेला दुसरा आरोपी ह.भ.प. अनिरुद्ध उर्फ निखिल रामभाऊ निंबाळकर महाराज अद्यापही फरार आहे. दरम्यान इंदापूर पोलीस या प्रकरणातील सत्य नी तथ्य तपासत आहेत.
अनेक तक्रारीनंतरही आरोग्य विभागाची तोतया डॉक्टरवर कारवाई का नाही?
आरोपी विजय वलगे हा मुंगशी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे खाजगी दवाखाना चालवतो. मात्र तो तोतया डॉक्टर असल्याबाबत, तथा त्याच्याकडे डॉक्टर असल्याची कोणतीही पदवी नसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर त्याची चौकशी, तथा त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी (पंचायत समिती कुर्डुवाडी, ता. माढा) आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारही देण्यात आली होती. मात्र संबंधितांकडून आरोपीची कोणतीही चौकशी व कारवाई न करता त्याला लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी मोकळीक दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपीवर कारवाई का करण्यात आली नाही? तक्रारदाराने अनेकवेळा माहिती मागूनही आरोग्य विभागाने माहिती देण्याचे का टाळले? तोतया डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यात व्यावसायिक भागीदारी आहे का? पोलीस प्रशासन आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही चौकशीच्या घेऱ्यात घेईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा