निवड सदाचार आणि भ्रष्टाचारातील; लोकांचा कल कोणाच्या बाजूने?
ए फॉर अमेठीनंतर बी फॉर बारामतीवर कब्जा करण्यासाठी भाजपने सर्वकाही पणाला लावले आहे. अजित पवारांच्या रुपात आयतच कोलीत हाती लागल्याने भाजपला हे काम अधिक सोप्प आणि सोईस्कर झाल्याचं म्हटलं जात आहे. बारामतीत पवारांना पवारच हरवू शकतात याचा अंदाजही भाजपला आहे. त्यामुळेच अजित पवारांच्या माध्यमातून पवारांच्या पायात पवारांचाच पाय अडकवण्याचा डाव भाजपने पूर्णत्वास आणला आहे. परिणामी "घरका भेदी लंका ढाये" ही म्हण खरी ठरते, का घर का भेदी कायमचा घराबाहेर फेकला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किंतु परंतु "पुढारी एक तरफ आणि जनता एक तरफ" अशी परिस्थिती जमिनीस्तरावर असल्याने ही खेळी भाजप आणि अजित पवार यांच्यावरच उलटणार असंच एकंदरीत चित्र दिसत आहे. कुटुंब, पक्ष, विचारधारा आणि ज्यांनी नेता केलं त्या मतदारांना डावलून भाजपशी मैत्री करण्यामागे अजित पवारांची काय अडचण होती हे न कळण्याइतपत जनता खुळी किंवा भोळी नाही. तदनंतरही मतदारांना भ्रष्टाचार प्रकरणातील क्लीन चीट खरंच क्लीन होती हे पटवून देण्यात अजित पवार यशस्वी होतात, का अद्याप भ्रष्टाचाराचा एकही आरोप न झालेल्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा संसदेत पाठवून बारामती मतदार संघातील नागरिक भ्रष्टाचार आणि सदाचार यातील फरक अधोरेखित करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
खरं तर अजित पवार ॲण्ड कंपनी भाजपच्या प्रेमात पडण्यामागची कारणे लपून राहिलेली नाहीत. किंतु परंतु बंडखोरीनंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक अजित पवार यांची क्षमता स्पष्ट करणारी, तर मतदारांच्याही सदविवेक बुद्धीचीही चाचपणी यातून ठरणार आहे. किंबहुना ही निवडणूक लोकांनीच आपल्या हाती घेतल्याने, तथा आजची एकंदरीत परिस्थिती पाहता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलटे फिरतील अशीच शक्यता दिसत आहे. कदाचित ही बाब अजित पवार यांच्याही लक्षात आली असावी. त्यामुळेच की काय पक्षाची विचारधारा बाजूला ठेऊन "अबकी बार मोदी सरकार" म्हणत मोदींच्या नावावर मते मागण्याची वेळ अजित पवार, राष्ट्रवादीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आली आहे. भाषण ठोकताना सो कॉल्ड राष्ट्रवादी-चे पदाधिकारी भाजपचे प्रवक्ते जास्त वाटत आहेत. इंदापूर तालुक्यातील सभा नी मेळाव्यांना पैसे देऊन लोकं आणावी लागत आहेत. प्रचारासाठी अंबालिका आणि दौंड शुगर कारखान्यांतील कामगारांना पाचारण करावे लागले. हे का झालं याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. याउलट परिस्थिती दुसरीकडे आहे. राजकारणाचे चाणक्य म्हटल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली खरा राष्ट्रवादीचा गट या निवडणुकीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे अस्तातून नव्या अस्तित्वाकडे उभारी घेईल असं चित्र आहे. याचं मुख्य कारण म्हणजे जनसामान्यांकडून शरद पवार यांना मिळत असलेला सहानुभूतीमय पाठिंबा. खरं तर बंडखोरी आणि पक्ष हिरावून घेण्यासाठी अजित पवारांनी भाजपसोबत मिळून खेळलेलं घाणेरडं राजकारण लोकांना आवडलेलं नाही. साहजिकच याचा सहानुभूतीपूरक फायदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बापलेकीला होईल. याच सहानुभूतीच्या लाटेत सुप्रिया सुळे "न भूतो न भविष्यति" एवढ्या बहुमताने चौथ्यांदा खासदार होतील असं एकंदरीत वातावरण आहे.
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोपही त्यांना अडचणीचे ठरतील. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात, तर अजित व सुनेत्रा पवार या दोघांनाही शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणात नुकतीच क्लीन चीट मिळाली असली तरी ही मिळण्यामागची पार्श्वभूमी आणि त्यांच्या कारणांची मीमांसा लोकं आपल्या पद्धतीने करत आहेत. याचा ऑडिट रिपोर्ट निकालानंतर कळेलच. केवळ अजित पवार यांच्या पत्नी एवढीच ओळख असलेल्या, तथा शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणी चर्चेत आल्यानंतरच सुनेत्रा पवार बहुतेकांना माहीत झाल्या. मात्र प्रतिस्पर्धी म्हणून दुसऱ्या बाजूला राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, महिला आणि महाराष्ट्रातील एकूण प्रश्नांची जाण, तथा सामान्यांचे प्रश्न संसदेत निर्भीडपणे मांडण्याची खुबी अंगी असलेल्या अभ्रष्ट खासदार सुप्रिया सुळे असं वर्गीकरण लोकं करताहेत.
पहाटेचा शपथविधी, पक्षाचा अध्यक्ष होण्यासाठी चाललेली खटपट, किंबहुना याचसाठी राजकीय बाप समजल्या जाणाऱ्या, तथा ज्यांनी दादा म्हणवून घेण्याइतपत पत वाढवली त्या सख्या चुलत्यांबरोबर केलेली बंडखोरी अजित पवारांची प्रतिमा जनसामांन्यांत मलिन करण्यास पुरेशी होती. वरून त्यांना "दादा" म्हणणाऱ्या बहिणीविरोधातच स्वतःच्या पत्नीला उभं करण्याचं त्यांचं कृष्णकृत्य लोकांना आवडलेलं नाही. कामाचा माणूस म्हणून क्लीन चीट का द्यायची? अशी रोषात्मक भावना लोकं बोलून दाखवत आहेत. महत्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे यांनी १५ वर्षात सत्ता भोगली आहे. त्यांनी काय कामं केली हा प्रश्न जनतेने विचारणं आवश्यक होतं. मात्र सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेपर्यंतचे रामायण अवघ्या महाराष्ट्रासमोर घडल्याने सुळे यांच्या विरोधातील anty incombuncy लोकं विसरून गेली आहेत. इथं सुनेत्रा पवार ऐवजी कांचन कुल अथवा अन्य कोणाला उमेदवारी दिली गेली असती तर यदाकदाचित सुप्रिया सुळे यांच्या कामाचं ऑडिट लोकांनी केलंही असतं. तशी चर्चा, परिणामी निकालाचं चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र सध्या सुळेच येणार, फक्त किती मतांनी येतील एवढाच प्रश्न बाकी आहे.
दुसरं म्हणजे भाजपने ज्या पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणाचा पायंडा पाडला आहे त्याचाही प्रचंड राग लोकांच्या मनात आहे. कष्ट करण्यापेक्षा आमच्या पक्षात या आणि बिनधास्त भ्रष्टाचार करा, तदनंतर सन्मानाने जगा असा संदेश भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना दिला आहे. खरं तर १० वर्ष एकहाती सत्ता देऊनही भाजपला ती पचवता आली नाही. जवळपास सर्वच बाबतीत फेल झालेल्या भाजपने केवळ देशाला जाती धर्मात वाटण्याचं, देशाला द्वेषाच्या खाईत लोटण्याचं काम इमाने इतबारे केलं. फोडाफोडीचे राजकारण, तपास यंत्रणांचा गैरवापर, अनियंत्रित महागाई, शैक्षणिक संस्था, शासकीय मालमत्तांची विक्री, युवकांना बेरोजगार करण्याचं, त्यांना गुलामगिरीकडे नेण्याचं षडयंत्र, भ्रष्टाचाऱ्यांना दिलेला आश्रय, रामभरोसे असलेली महिलांची सुरक्षा, विरोधकांची, माध्यमांची मुस्कटदाबी, अशा अनेक कारणांमुळे भाजप सध्या बॅकफुटवर आहे. त्यामुळेच जनतेच्या मुळ प्रश्नांना बगल देत धार्मिक ध्रुवीकरणाच्या भिकार मुद्द्यांधारे मतांची भीक मागण्याची वेळ मोदी आणि भाजपवर आली आहे. मोदींच्या एकाधिकारवादी आणि अहंकारी वागण्याने, सरकारी यंत्रणांचा बेलगामी दुर्वापराने, लोकशाहीच्या गळचेपीमुळे आणि संविधान बदलाच्या प्रयत्नांमुळे देशभरात भाजपविरोधी लाट आहे. हीच लाट अजित पवारांनी "अबकी बार मोदी सरकार" म्हणत आपल्याही अंगावर घेतली आहे. आ बैल मुझे मार असंच म्हणावं लागेल...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील घडामोडींबाबत बोलायचे झाल्यास एकमेकांचे कट्टर विरोधक आजी माजी आमदार सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात आहेत. परंतु यामुळे सुनेत्रा पवार यांचं पारडं जड होईल, अथवा आजी माजी आमदारांच्या पारड्यात असणारी मतं सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात पडतील असं गृहीत धरणं चूक ठरेल. "आमदारकीला बघू आत्ता तुतारीच वाजवायची" असा भावनात्मक कल सर्वसामान्य लोकांचा दिसत आहे. दत्तात्रय भरणे यांच्यावर रस्त्यांच्या कामांत झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि ज्यांच्या शेवटच्या सभेमुळे २०१९ मध्ये भरणे तरले होते त्या शरद पवारांशी, तालुक्यातील सेक्युलर मतदारांशी केलेल्या गद्दारीमुळे तालुक्यातील सामान्यच नव्हे, तर खुद्द राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांमध्येही प्रचंड नाराजी आहे. घड्याळाला मत म्हणजे कमळाला मत हे गणित उघड आहे. भाजप जातीवादी पक्ष आहे हे प्रत्येक सभेत ओरडून सांगणाऱ्या भरणेंचं भाजपसोबत जाण्याचं कृष्णकृत्य जातीवादी पक्षांना थारा न देणाऱ्या इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या नाराजीचं कारण ठरलं आहे. या नाराजीचं ओझं सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात पडू शकतं. दुसरीकडे माजी सहकार मंत्री, तथा एका वेळचे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे हर्षवर्धन पाटील यांना ज्यांच्यामुळे भाजपमध्ये जावं लागलं त्याच पवारांसाठी ते आज पुन्हा मतं मागताहेत हे देखील तालुक्यातील लोकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पटलेलं नाही. नव्हे खुद्द पाटील यांच्या कुटुंबातीलच काहींना हे पटलेलं नाही अशीही कुजबुज सभा, मेळाव्यांमध्ये राजवर्धन पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे लोकांनी करणं स्वाभाविक आहे. फिरून पुन्हा भोपळा चौकातच यायचं होतं, पवारांचाच प्रचार करायचा होता तर पक्षच का बदलला? सख्या चुलत्यांचा विश्वासघात केलेले, बहिणीला पाडण्यासाठी विरोधकांशी संगनमत करणारे उद्या विधानसभेवेळी आपल्याशी प्रामाणिक राहतील कशावरून? अशी सवालात्मक चर्चाही खुद्द पाटील यांच्या गोटातून ऐकू येत आहे.
शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे १५ वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप न झालेल्या सुप्रिया सुळे आहेत. तर विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप आणि तत्संबंधी शंका कुशंकांचे कमी अधिक वलय चिटकून असलेले अजित पवार, सुनेत्रा पवार, आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील दुसरीकडे आहेत. लोकशाही वाचवण्यकामी भ्रष्टाचार आणि सदाचार यातील फरक स्पष्ट करण्याची, आपला पक्ष, आपला नेता, आपली कामं, आपला फायदा तोटा हे काही न पाहता योग्य उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी मतदारांची आहे. हा फरक चुकल्यास पुन्हा ५ वर्ष केवळ पश्चातापाचे टाळ पिटत बसावे लागतील.

मस्त विश्लेषण केलं समिरभाई
उत्तर द्याहटवाभ्रष्टाचारावर लोकांच्या भावना भारी पडतील. भ्रष्टाचारी कोण आहेत आणि भावना कोणाच्या बाजूने आहेत हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही म्हणता तसे खरेच घड्याळाचे काटे यावेळी उलटे फिरणार
उत्तर द्याहटवा