वालचंदनगर पोलिसांवर आरोपींना सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
[नुकताच राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारलेल्या रश्मी शुक्ला यांनी एक्स'वरून केलेल्या आवाहनामध्ये पोलिसांच्या चुकांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याचे मान्य करत, लोकांचा विश्वास जिंकणे ही आमची जबाबदारी असल्याची ग्वाही दिली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसेल तर पोलीस महासंचालक कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तदनंतर लगेचच पोलिसांवर आरोपाचे हे प्रकरण समोर आले आहे.]
आर्थिक तडजोड करून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वालचंदनगर पोलिसांवर करण्यात आला असून, यासंदर्भात चौकशीची मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. हमजुखान बाबुलाल सय्यद (रा. कडबनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूसंदर्भातील तपासप्रकरणी वालचंदनगर पोलिसांवर हे गंभीर आरोप केले आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे ८ फेब्रुवारी रोजी केलेल्या तक्रारी अर्जान्वये प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा २० फेब्रुवारीपासून वालचंदनगर पोलीस ठाण्यासमोर संपूर्ण कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस या संदर्भात कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
७ जानेवारी २०२४ रोजी फिरोज बाबुलाल सय्यद (रा. कडबनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा मृतदेह घराशेजारील शेततळ्यात सापडला होता. त्यांना पोहता येत असल्याने ही आत्महत्या नसून, त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत या हत्येमागे मृताची पत्नी रेहानाबी आणि तिच्या अनेकांशी असलेल्या अनैतिक संबंधांची पार्श्वभूमी असल्याचे मृताच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. या संदर्भात मृताचे वडील बाबुलाल महबुब सय्यद यांनी रेहानाबी यांच्याविरोधात भा.द.वि. ३०६ अन्वये वालचंदनगर पोलीस ठाण्यात १३ जानेवारी रोजी गुन्हाही दाखल केला होता. मात्र ही तक्रार अर्धवट घेण्यात आल्याचे, तथा संबंधित अन्य सहा संशयित आरोपींची नावे पोलिसांनी जाणीवपूर्वक वगळल्याचे, परिणामी पोलिसांनी आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याचा संशय मृताचे लहान भाऊ, तथा तक्रारदार हमजुखान यांनी तक्रारी अर्जात व्यक्त केला आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा