४० फुटीवर हिंस्र पाळीव कुत्र्याची दहशत; एकाच दिवसात ११ जणांवर हल्ला
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१७ नोव्हेंबर) - इंदापूर नगरपरिषदेच्या पूर्वेकडून जाणाऱ्या ४० फुटी रस्त्यावर एका पाळीव मात्र हिंस्र कुत्र्याने चांगलीच दहशत माजवली असून, काल (१६ नोव्हेंबर) एकाच दिवसात या कुत्र्याने हल्ला करून तब्बल ११ जणांना जखमी केले आहे. मादा जातीच्या या कुत्र्याने याआधीही अनेक जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले होते. नागरिकांच्या अनेक तक्रारी आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध वृत्तानंतरही नगरपरिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कुत्र्याची, परंतु या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यास धजावत नसलेल्या नगरपरिषद प्रशासनावर कोणाची दहशत आहे? कोण यांना धाकात ठेवत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून निघालेल्या विजय शेवाळे यांच्या डाव्या पायाचा चावा घेत या कुत्र्याने त्यांना गंभीर जखमी केले. तर इंदापूरमध्ये नितीन अर्जुन पवार (रा. ४० फुटी रोड, इंदापूर) यांच्या घरी पाहुण्या म्हणून आलेल्या इंदुमती सिताराम आटोळे (रा. शिर्सुफळ, ता. बारामती) या महिलेलाही याच कुत्र्याने गंभीर जखमी केले. उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर माहिती मिळाली की या ठिकाणी अनेकजणांनी याच कुत्र्याच्या कारनाम्यापायी रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली आहे. इलजास्तव अनेकांना हजारोंचा फटकाही बसला आहे. त्रास झाला तो वेगळाच.
मागील अनेक महिन्यांपासून हा चावाचावीचा खेळ सुरू असून, या प्रकारामुळे सदर परिसरातील रहिवाशी आणि येणाजाणाऱ्या नागरिकांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये या कुत्र्याची दहशत पसरली आहे. हा रस्ता कायम वर्दळीचा असल्याने अनेकजण या कुत्र्याचे सहज शिकार होताना दिसत आहेत. परिणामी या ठिकाणाहून जाण्यास नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे. हा कुत्रा पाळीव असल्याचे, तथा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना, लहान सहान मुलांना, विद्यार्थ्यांना जखमी करून हे कुत्रे महाशय रस्त्याकडेलाच चिटकून असलेल्या घरात जात निघून जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. अनेक तोंडी आणि लेखी तक्रारी नंतरही नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे या कुत्र्याच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यास नगरपरिषद प्रशासन याची जबाबदारी घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
इंदापूरमध्ये सध्या कुत्र्यांचेच राज्य.....
एकंदरीत संपूर्ण शहरात यावेगळी परिस्थिती नाही. शहरातील वेगवेगळ्या भागात डुकरांची आणि मोकाट कुत्र्यांची टोळकी हिंडरताना सहज दिसून येतील. विशेषतः चौकाचौकात, गल्लीबोळात, भार्गवराम तलावाच्या कडेने भटक्या कुत्र्यांची टोळकी नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. नागरिकांना भुंकणे, त्यांचा चावा घेणे, वाहन चालकांच्या मागे धावणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. निदर्शनात आणून दिल्यानंतरही संबंधित प्रशासन याला गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याने इंदापूरमध्ये सध्या कुत्र्यांचेच राज्य असल्याचे दिसत आहे.

या कुत्र्यावर नगरपरिषदेची कृपा आहे. नगरपरिषदेवर मागील 3 वर्षांपासून प्रशासक आहे. तो कुणाचे ऐकायला तयार नाही. नगरसेवक आम्ही रिटायर झाल्याचे सांगत आहेत. नागरिकांनी जायचे कोणाकडे
उत्तर द्याहटवा